नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे असलेल्या श्री रामदेव बाबा मंदिराचा २१ वा वर्धापन दिन भक्तिभाव व उत्साहात साजरा होत असून, यानिमित्त आयोजित माघ मेला उत्सव भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्रातील रामदेव बाबांचे अत्यंत भव्य व श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात देशभरातून हजारो भक्त दाखल झाले आहेत.माघ मेळ्यानिमित्त होम-हवन, अभिषेक, भंडारा, चंद्रपूजन आदी विविध धार्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा येथील मुख्य रामदेवजी मंदिराच्या परंपरेशी नशिराबादचे मंदिर जोडले गेले असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या श्रद्धास्थानांपैकी एक म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.या मंदिराचे प्रमुख विश्वस्त किरणकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. सन २००५ मध्ये स्थापन झालेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या ११ महिन्यांत मंदिराची उभारणी पूर्ण करण्यात आली होती. कालांतराने या मंदिराला केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.रामदेवजी बाबा यांना राजस्थानमध्ये मुस्लिम बांधवही श्रद्धेने मानतात. ते त्यांना ‘रामसापीर’ या नावाने ओळखतात. रामदेवजी बाबांवर ३६ जाती-धर्मातील लोकांची अढळ श्रद्धा असून, अनेक भक्तांना साक्षात चमत्कार अनुभवास आल्याचे सांगितले जाते. मनोकामना पूर्ण झाल्याच्या असंख्य साक्षी भाविकांकडून दिल्या जातात.
या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून, सन २००८ पासून सलग १७ वर्षे भाद्रपद महिन्यात जळगाव येथून पायी यात्रा नशिराबादच्या रामदेवजी बाबा मंदिरात येत आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणावर भाविकांचा प्रतिसाद लाभतो.
आजपर्यंत चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी या मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरीजी महाराज यांनीही नशिराबादच्या रामदेव बाबा मंदिराला भेट देत दर्शन घेतले होते.२१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित माघ मेला उत्सवामुळे नशिराबादचे नाव राज्यासह देशपातळीवर पुन्हा एकदा उजळले असून, सर्वत्र भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


