राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ संदर्भातील नामनिर्देशन प्रक्रियेला महत्त्वाचा वळण मिळाले आहे. आयोगाने दि.४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन स्वीकारली जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे.नामनिर्देशन सादरीकरणासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना, यंत्रणेवर वाढता ताण व उमेदवारांना समान संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आयोगाच्या दि.१२ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार, दि.१५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत (रविवार, दि.१६ नोव्हेंबर सार्वजनिक सुट्टी असूनही) दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन तसेच पारंपारिक ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करता येणार आहेत.
राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांना या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून, ही सूचना मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार सचिव सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

