नंदुरबार | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नंदुरबार शहरात गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या बनावट जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांच्या गंभीर गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणात वकिलासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सायबर कॅफेमधून बनावट सरकारी शिक्क्यांचा वापर करून बोगस प्रमाणपत्रे तयार केली जात असल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे.या प्रकरणात सायबर कॅफेचालक, नगरपरिषदेचा ऑपरेटर, पालिकेचा शिपाई, एक वकील व आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे नगरपरिषदेतील कर्मचारीच या रॅकेटमध्ये सामील असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात असलेल्या आर. के. ऑनलाइन सायबर कॅफे येथून हा गैरप्रकार चालवला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीलेश देसले यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार २९ जानेवारी रोजी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या वेळी बनावट सरकारी शिक्के, जन्म-मृत्यूचे बनावट दाखले, लॅपटॉप, प्रिंटर, संगणक तसेच पाच मोबाइल फोन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिल यशवंत कोळी (नगरपरिषद ऑपरेटर), रिजवान सुभान खान (सायबर कॅफेचालक), इमरान याकूब पिंजारी (वकील), लाला उर्फ मोहम्मद अली मोहम्मद युसूफ पटेल (नगरपरिषद शिपाई) आणि शेख शफिक शेख इसाक कुरेशी (सायबर कॅफेशी संबंधित) यांचा समावेश आहे.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक व जन्म-मृत्यू नोंद विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे युवराज श्रीपत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू असून नागरिकांनी शासकीय प्रमाणपत्रांसाठी केवळ अधिकृत कार्यालये व शासनमान्य केंद्रांशीच संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस. यांनी केले आहे. संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

