नाशिक | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. महसूल खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आल्याने संबंधित जमीन व्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये येऊन एका हॉटेलची झाडाझडती घेतली होती. या हॉटेलमध्ये हनी ट्रॅप संदर्भात महत्त्वाची माहिती मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संशयित व्यावसायिक जमिनीच्या व्यवहारात गुंतलेला असून, त्याच्या मालकीच्या जमिनींमध्ये आदिवासी आणि शर्तीच्या जमिनींचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.राजकीय क्षेत्रात या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून, विरोधी पक्षांनी या घडामोडीवरून सरकारवर चौकशीचा दबाव वाढवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात ७० पेक्षा अधिक शासकीय अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्र्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी पोलिसांकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नाही. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी गोपनीय चौकशी सुरू केली असून, लवकरच विशेष तपास पथकाची नेमणूक होण्याची शक्यता आहे. तसेच, गरज भासल्यास सायबर क्राईम विभागाची मदत घेण्यात येणार असल्याचेही समजते.
पुढील तपास सुरू असून, मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

