नाशिक /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह – नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त पदावर दत्तात्रय कराळे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाने सोमवारी काढले आहेत.
कॅटमध्ये मिळाला होता दिलासा…
नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक असलेले बी.जी.शेखर यांची गत वर्षाच्या अखेरीस बदली करण्यात येऊन त्यांच्या जागी दत्तात्रय कराळे यांची वर्णी लागली मात्र सेवानिवृत्तीला काही महिने बाकी असताना बदली करण्यात आल्याने बी.जी.शेखर यांनी बदली आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. नियमानुसार सेवानिवृत्तीला काही महिने बाकी असताना बदली होत नसल्याचे सांगत त्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली होती.
दत्तात्रय कराळे यांनी यापूर्वीही सांभाळला होता जळगाव पोलीस अधीक्षकपदाचा पदभार..
दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने बदली प्रक्रिया थांबली होती. 31 मे 2024 रोजी पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचा कार्यकाळ सेवानिवृत्तीमुळे संपुष्टात आल्याने तात्पुरता पदभार रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला होता. देशातील निवडणूक प्रक्रिया 1 जून रोजी पार पडल्यावर आचारसंहिता काहीशी शिथील झाली होती. सोमवारी शासनाने पदस्थापनेचे आदेश पारीत करीत नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक म्हणून दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती केली. कराळे यांनी यापूर्वी जळगाव पोलीस अधीक्षकपदाचा पदभारही सांभाळला आहे.