नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरात अवैध गोवंश कत्तल व मांस विक्री प्रकरणी पोलिसांनी पहाटे धडक कारवाई करत सुमारे ४० किलो संशयित गोमांस जप्त केले. या कारवाईत स्थानिक रहिवासी दाऊद मोरक्या कुरेशी (वय ६५) याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई १६ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ५.४५ वाजता शहरातील निचवास मोहल्ला परिसरात नशिराबाद पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरात अवैधरीत्या गोवंश कत्तल करून मांस विक्री सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला असता संशयित व्यक्ती मांस विक्री करताना आढळून आला.
कारवाईदरम्यान सुमारे ४० किलो मांस जप्त करण्यात आले असून प्राथमिक तपासात ते गोवंशाचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जप्त नमुने पुढील वैद्यकीय व पशुवैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जप्त मालाचा पंचनामा करून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे.
संशयिताविरुद्ध गोवंश संरक्षण कायदा, अन्न सुरक्षा कायदा तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागील पुरवठा साखळी, संबंधित व्यक्ती व संभाव्य जाळे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. शहरात अवैध कत्तल व मांस विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

