नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुढे आली आहे. याबाबत समाजसेवक भूषण कोल्हे यांच्याकडून नशिराबाद नगरपरिषदेकडे लेखी अर्ज सादर करण्यात आला आहे.सदर अर्जामध्ये नमूद केल्यानुसार, शहरातील विविध प्रभागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना भीती वाटत आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनाही घडत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याबाबत कार्यालयात दि.12 फेब्रुवारी 2026 रोजी पहिला अर्ज देण्यात आला होता तरी या अर्जाची आज पर्यंत कोणतीही दाखल घेतली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत सरकारने जाहीर केलेल्या Animal Birth Control Rules 2023 नुसार भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी (Sterilization) व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे बंधनकारक आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्याची प्रक्रिया राबविणे अपेक्षित आहे.या पार्श्वभूमीवर नशिराबाद नगरपरिषदेमार्फत शहरात ABC (Animal Birth Control) कार्यक्रम तात्काळ राबवून भटक्या कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
या सदर बाबीची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही संबंधितांकडून करण्यात आली आहे. या अर्जाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव तसेच नशिराबाद पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे.


