नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद गावात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला, वृद्ध, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थी यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गावकरी सांगतात की, गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांची संख्या अचानकपणे वाढली आहे. अनेक वेळा ही कुत्र्यांची टोळी शाळकरी मुलांच्या मागे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये बकऱ्यांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमाही केल्या आहेत. तर काही ठिकाणी मोकाट चरणाऱ्या गुरांवर देखील हल्ले झाले आहेत. ग्रामस्थांचा याबाबत संशय आहे की, आजूबाजूच्या शहरांमधून पकडून आणलेले कुत्रे नशिराबाद परिसरात सोडले जात आहेत. यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून नागरिक प्रचंड धास्तावले आहेत.
ग्रामस्थांची मागणी:
“अलीकडेच जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नशिराबादमध्ये अशी दुर्दैवी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ कठोर उपाययोजना कराव्यात,” अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाला नागरिकांचा ईशारा:
नशिराबाद ग्रामस्थांनी नगरपरिषदेला या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन केले असून, जर नगर- परिषदेने वेळेत कारवाई केली नाही, तर गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात जातील, असा इशाराही नागरिकांतर्फे दिला जात आहे.