Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeअपघातनशिराबादमध्ये भीषण अपघात : दोन युवक गंभीर ; नगरपरिषदेचा निष्काळजीपणा जीवावर

नशिराबादमध्ये भीषण अपघात : दोन युवक गंभीर ; नगरपरिषदेचा निष्काळजीपणा जीवावर

धोकादायक वळण, रस्त्यावरील अंधार, सुसाट अवजड वाहतूक व स्पीड ब्रेकरचा अभाव ठरले प्रमुख कारण.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील जळगाव–नशिराबाद मुख्य रस्त्यावर शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातामागे केवळ वाहनचालकांची निष्काळजीपणा कारणीभूत नसून, रस्त्यावरील मूलभूत सुविधांचा अभाव हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. धोकादायक वळण, अनेक महिन्यांपासून असलेला अंधार, अवैध गौण खनिजांची सुसाट वाहतूक तसेच आवश्यक असूनही न बसवलेले स्पीड ब्रेकर यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.उर्दू हायस्कूलजवळ शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास नशिराबादहून जळगावकडे जाणारी MH-19-DL-2137 क्रमांकाची मोटरसायकल आणि जळगावहून नशिराबादकडे येणारी अज्ञात कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील साहिल खाटीक बिस्मिल्ला खाटीक (वय २०) आणि अजित शेख फजलू शेख (वय २५, रा. निचवास मोहल्ला, रहिमतपुरा, नशिराबाद) हे दोघे युवक गंभीर जखमी झाले. धडक इतकी तीव्र होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

सदर रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिव्यांची कोणतीही व्यवस्था नसून, याबाबत स्थानिक दैनिकांतून वारंवार समस्या मांडूनही नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मुख्य कमानीपासून महात्मा फुले नगर, अहिल्यादेवी नगर तसेच पेठ भागाकडे जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग पूर्णतः अंधारात असून, ना पथदिवे आहेत ना विजेच्या खांबांची व्यवस्था. परिणामी रात्रीच्या वेळी वाहनचालकांना समोरचा अंदाज न येता अपघातांचा धोका वाढत आहे. या मार्गाने रात्री उशिरा ट्युशन क्लासेसमधून परतणारे विद्यार्थी, महिला वर्ग तसेच पेठ भागात जाणारे नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अपघात किंवा अन्य अनुचित घटना घडण्याची शक्यता कायम आहे. नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन या रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याचे चित्र आहे.काही दिवसांपूर्वी याच अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेची मंगळसूत्र चोरी केल्याची घटनाही घडली होती.या रस्त्यावरून दररोज क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणारी अवैध गौण खनिजांची अवजड वाहने मोठ्या वेगाने धावत असतात. अरुंद व वर्दळीच्या रस्त्यावर ही सुसाट वाहतूक नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी ठरत असून, यामुळे किरकोळ अपघात नित्याचे झाले आहेत. वारंवार अपघात होत असतानाही या ठिकाणी आवश्यक स्पीड ब्रेकर अद्याप बसविण्यात आलेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेली अज्ञात कार घटनास्थळावरून पसार झाली असून, नशिराबाद पोलिसांनी पंचनामा करून वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे. रस्त्यावरील अंधार, अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक, अपुरी रस्ता सुरक्षा व पथदिव्यांचा अभाव यामुळेच हा अपघात घडल्याचे बोलले जात असून, तात्काळ उपाययोजना न झाल्यास भविष्यात अधिक गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा..
सदर रस्त्यावर कायमस्वरूपी अंधार व अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गावर भविष्यात कोणतीही अनुचित अथवा अपघाती घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर राहील, असा ठाम इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.दररोज या रस्त्याचा वापर करणारे विद्यार्थी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिक यांना अंधारामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर तात्काळ पथदिव्यांची उभारणी करून प्रकाशव्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने या मागणीकडे त्वरित लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या