नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे गावातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. याबाबत बॅटरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला बॅटरी (मुद्देमाल) सहित ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. बॅटरी मालकांनी आपल्या चोरी गेलेल्या बॅटरी ओळखल्या होत्या, परंतु या प्रकरणाचीही पुरेशी माहिती उपलब्ध झाली नव्हती.अजूनही बॅटरी चोरीच्या घटना घडतच आहे.त्यानंतर काही दिवसांपूर्वी माजी सैनिक भगवान नाथ यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व साहित्यावर हात साफ केला. तर ३० जुलै रोजी माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश बोंडे यांची बोलेरो गाडी चोरीस गेली. तसेच अजून एक बोलेरो गाडी चोरीचा प्रयत्न फसला. ताज्या घटनेत काल रात्री राकेश नारायण माळी यांच्या मालवाहू रिक्षामधून बॅटरीची चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
गावात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असूनही अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी पोलिसांकडून गस्त वाढविण्याची, तपास अधिक गतीमान व परिणामकारक करण्याची मागणी केली आहे. माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश बोंडे यांच्या बोलेरो चोरी प्रकरणाबाबत पोलीस स्टेशनकडून अधिकृत माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. दरम्यान, नागरिकांचे म्हणणे आहे की गावाच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांनी संयुक्तपणे पुढाकार घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, जेणेकरून अशा घटना रोखल्या जाऊ शकतात.