नशिराबाद/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह: नशिराबाद शहरात डासांचा प्रचंड त्रास वाढला असून यामुळे अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. डासांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, शहरात घराबाहेर बसणे तर दूरच, घरातसुद्धा शांतपणे राहणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर माजी सरपंच पंकज श्यामकांत महाजन व अन्य ग्रामस्थांनी नशिराबाद नगरपरिषदेकडे निवेदन सादर करून शहरात तातडीने डास निर्मूलन मोहीम हाती घेण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरात गटारीतील साचलेले पाणी, रिकाम्या प्लॉटमधील गवत, जुन्या टायर व डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. शहरात सध्या ४ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून, वाकी नदी पात्रातील साचलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे नगरपरिषद प्रशासनाने त्वरीत पुढील उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:
फॉगींग मशीनद्वारे सायंकाळी धुरळणी करावी.
गटारीतील साचलेले पाणी आणि गाळ तातडीने काढावा.
शौचालयांच्या हवाई पाइप व आउटलेटना जाळी बसवावी.
आठवड्यात एक दिवस “ड्राय डे” म्हणून जाहीर करावा.
संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवावी.
सोशल मीडिया, दवंडी आणि फलकांद्वारे जनजागृती करावी.
नगरपरिषदेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन उदासीन असल्याचा आरोप
सद्यस्थितीत नगरपरिषदेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन उदासीन असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. योग्य ती उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.निवेदनावर माजी सरपंच पंकज महाजन, विकास धनगर, चेतन बराटे, अरुण भोई, देवेंद्र पाटील यांची स्वाक्षरी आहे.