Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबाद पेठ भागातील म्हैस व पारडू लंपास ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण..!

नशिराबाद पेठ भागातील म्हैस व पारडू लंपास ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण..!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पेठ परिसरात गुरांची चोरी झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, शेतकरी किरण रमेश पाटील यांच्या उमाळा रस्त्यावरील शेतातून अज्ञात चोरट्यांनी एक म्हैस व तिचे पारडू चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.किरण रमेश पाटील (राहणार नशिराबाद पेठ) यांच्या शेतात गुरेढोरे व पिकांच्या संरक्षणासाठी रात्री सालदार शेतातच वास्तव्यास होता. रात्री झोपेतून जागे झाल्यानंतर गोठ्याकडे पाहणी केली असता एक म्हैस व तिचे पारडू दिसून आले नाही. तत्काळ त्यांनी ही बाब शेतमालक किरण पाटील यांना कळवली.उमाळा रस्त्यालगत असलेल्या गोठ्यातून चोरट्यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज असून, चोरटे म्हैस व पारडू घेऊन उमाळा रस्त्याच्या दिशेने पसार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी शेतमालकांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र चोरी गेलेल्या जनावरांचा कोणताही माग काढता आला नाही.या घटनेमुळे नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, नशिराबाद परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. कधी दुचाकी, कधी चारचाकी वाहनांच्या चोरीनंतर आता थेट गोठ्यांमधून गुरांची चोरी होत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. थोड्याच दिवसांपूर्वी नशिराबाद येथील भवानीनगर भागातही गुरे चोरी गेल्याची घटना घडली होती. यामुळे रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी तसेच शेतातील गोठ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या