नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबादजवळ सावन हॉटेलसमोर दुचाकी व खासगी ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी (क्र. एम.एच. १९ ई.एल. ४४६०) चालक अंकुश गोकुळ चव्हाण (वय २२, रा. मीठापुर, जि. बऱ्हाणपूर, म.प्र.) हा सध्या कामानिमित्त रायपूर–कुसुंबा (जळगाव) येथे आपल्या आतेभावाकडे वास्तव्यास होता. तो काल मंगळवार रोजी सकाळी जळगावकडून नशिराबादकडे सर्व्हिस रोडने जात असताना सावन हॉटेलजवळ सर्व्हिस रोडवरून मुख्य रस्त्यावर वाहन घेत असताना भुसावळहून जळगावकडे येणारी एम.एस.टी. खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स (क्र. एम.पी. ६९ पी ०१८५) अचानक समोर आली. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाखाली दुचाकी अडकल्याने अंकुश चव्हाण गंभीर जखमी झाला.अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. जखमीला तत्काळ उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात मुख्य रस्त्यावरून भुसावळकडून जळगावकडे जाणारी कार (क्र. एम.एच. २८ बी क्यू ६४५५) देखील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. कारचालक आदित्य प्रकाश लोखंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ट्रॅव्हल्समध्ये दोन प्रवासी असल्याची माहिती आहे.ट्रॅव्हल्स चालक रुमालिया तेरसिंग सिंगर (वय ३५, रा. काबरील, जि. खरगोन) हा नशिराबाद पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. मात्र सायंकाळपर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्याशी संपर्क साधला असता, मयताच्या कुटुंबीयांकडून फिर्याद प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

