नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरात सोमवारी उशिरा रात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून एका विवाहितेने आपल्या सहा वर्षीय मुलीसह धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्येचा धक्कादायक मार्ग अवलंबला. भादली रेल्वे पुलाजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत मायलेकींची नावे मनीषा सुरेश कावळे (वय २८) व मुलगी गौरी सुरेश कावळे (वय ६) अशी असून, या घटनेने कावळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भवानी नगरात मनीषा कावळे या पती सुरेश व दोन मुलींसह राहत होत्या. सुरेश चंद्रकांत कावळे हे एमआयडीसी परिसरातील एका चटई कंपनीत कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मनीषा यांनी गावातील एका ओळखीच्या महिलेकडून रेशनसाठी तांदूळ आणण्याचे कारण सांगत घराबाहेर पाऊल टाकले. त्यांच्यासोबत लहान मुलगी गौरीही होती. मात्र संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने पतीने शोधाशोध सुरू केली. त्याचवेळी भादली पुलाजवळ एका महिलेने मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी रूपेश साळवे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली असता मृतदेह मनीषा व गौरी यांचे असल्याचे समोर आले.
या दुर्दैवी घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मायलेकींच्या निधनाने ग्रामस्थांसह नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

