नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवातील मुख्य आकर्षण ठरणारा ‘बारागाड्या’ ओढण्याचा पारंपरिक सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सुमारे दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या सोहळ्यावेळी मंदिर परिसरात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.या ऐतिहासिक परंपरेनुसार बारागाड्या ओढण्याचा मान धोबी घराण्याकडे असून, यंदाही युवराज मोतीलाल धोबी यांनी ही परंपरा पुढे नेत सोहळा साजरा केला. सकाळी अभिषेक व महापूजेनंतर दुपारी वाद्यांच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत बारागाड्या ओढण्याचा विधी पार पडला.

यात्रोत्सवासाठी नशिराबादसह आसपासच्या भागांतून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत भोळे, उपाध्यक्ष किशोर पाटील आणि खजिनदार ज्ञानदेव लोखंडे यांनी नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.सोहळ्यास नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, माजी जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाची शोभा अधिकच वाढली.

दरम्यान, भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपरिषद, पोलीस विभाग आणि यात्रा समिती यांच्या समन्वयामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

