८ दिवसांत कारवाई न झाल्यास… नागरिकांनी नगरपरिषदे समोर गुरे-ढोरे बांधण्याचा… निवेदना द्वारे दिला इशारा…
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद गावात सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे लक्षात आले आहे. ग्रामस्थांच्या मते, कदाचित आजूबाजूच्या शहरांमधून पकडलेले कुत्रे येथे सोडण्यात येत आहेत, ज्यामुळे परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
गावात अनेकवेळा शाळकरी मुलांच्या मागे हे कुत्रे धावत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच, काही दिवसांपूर्वी दोन-तीन वेळा भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांवर आक्रमण करून त्यांना गंभीर जखमी केले होते. नशिराबाद परिसरातील वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, शाळकरी विद्यार्थी तसेच शेतकरी वर्ग या धोक्याच्या जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त करत आहेत.
विशेषतः नशिराबाद गावातील रहिवासी म्हसोबा टाकी भागात कुत्र्यांनी मांडलेला हौदोस अत्यंत गंभीर असल्याचे ग्रामस्थांच्या निवेदनातून समोर आले आहे. अंदाजे २५ शेतकऱ्यांच्या प्राण्यांना कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे प्राणहानी होऊन शेतकरी अत्यंत चिंतेत आहेत. “आम्ही सगळे परेशान आहोत, तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना कराव्यात,” असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर नशिराबाद नगरपरिषद मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांना ग्रामस्थांनी तातडीने कारवाईची मागणी करत निवेदन दिले आहे. “काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती नशिराबादमध्ये होऊ नये,” अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
निवेदनात माजी सरपंच पंकज महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अध्यक्ष निलेश रोटे, भूषण कोल्हे, शेतकरी किरण बोंडे, पिंटू बोंडे, पराग बोंडे, लालचंद कावळे, तुषार चौधरी, गुणवंत नारखेडे, चंदन महाजन, अर्जुन कोल्हे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते. त्यांनी नगरपरिषदेला स्पष्ट इशारा दिला की आठ दिवसांत कुत्रे पकडून नेण्याची मोहीम न केल्यास सर्व शेतकरी नगरपालिकेवर आपली गुरे-ढोरे बांधून आंदोलन करतील.
नगरपरिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवावे, अन्यथा परिसरातील नागरिकांचे सुरक्षित जीवन धोक्यात येण्याची गंभीर शक्यता व्यक्त केली जात आहे.