नशिराबाद | मुख्य संपादक चंदन पाटील | पोलीस दक्षता लाईव्ह :- गेल्या तीन ते चार दिवसांपासून नशिराबाद परिसरात एक विचित्र आणि अस्वस्थ करणारी अफवा पसरली असून त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या या घटनांमुळे गावात खळबळ माजली आहे. लहान शाळेच्या मुलांमध्ये आणि पालकांमध्येही भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, नशिराबाद येथे रात्रीच्या सुमारास एक वयोवृद्ध महिला गावातील वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन काही निवडक घरांसमोर रस्त्यावर रिंगण तयार करत असून त्यात बाहुली ठेवून ती निघून जात असल्याच्या अफवा गावभर पसरल्या आहेत. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये रस्त्यावर तयार केलेले रिंगण आणि त्यामध्ये ठेवलेली बाहुली स्पष्ट दिसत आहे. ही अफवा इतकी पसरली की नागरिकांमध्ये अंधश्रद्धा, भीती आणि संशयाने भारलेली चर्चा रंगू लागली. या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले असून काहींनी यामागे अघोरी कृत्याचा संशय व्यक्त केला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ए.सी. मनोरे यांनी सुरुवातीला अशा कोणत्याही घटनेची अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ लक्ष घालत, ही एक अफवा असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले. पोलिस प्रशासन तपास करत असून कोणतीही अघोरी कृती वा समाजकंटक कृती नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, एका महिलेचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ती महिला घरोघरी जाऊन पैसे मागताना दिसत आहे. त्यामुळे काहींनी तिला संशयाच्या भोवऱ्यात आणले. अधिक तपास केला असता ती महिला गावात वर्गणी गोळा करण्यासाठी फिरत असतानाची माहिती मिळाली. याच संदर्भात ज्या नशिराबाद येथील भाडेकरू महिलेवर संशय घेतला जात होता, ती चतुर्मास निमित्त पंढरपूर येथे गेल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदभाऊ रोटे यांनी संबंधित घरमालक व शेजाऱ्यांकरवी स्वतः तिला फोन करून स्पष्ट केली आहे. त्या मुळे ती निव्वळ अफवा आहे असे यावरून स्पष्ट होते. तसेच माजी सरपंच पंकज महाजन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी याबाबत सतर्क राहावे, आणि अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
गावात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत, परंतु आतापर्यंत त्यात अशा कोणत्याही व्यक्तीचा ठोस पुरावा सापडलेला नाही. या कॅमेऱ्यांची माहिती त्याच्याजवळ आहे असे लक्षात येते. त्यावरून ती व्यक्ती बाहेरची नसून गावातीलच असण्याची शंका येते. त्यामुळे या घटनेट एकटा व्यक्ती आहे की, यामागे एखादा सामूहिक नियोजित कट आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. एकाहून अधिक समाजकंटक यामध्ये गुंतले असण्याची शक्यता आहे.
या साऱ्या प्रकारामुळे गावकऱ्यांनी पोलिसांकडून जलद व ठोस तपासाची मागणी केली आहे. अंधश्रद्धा, भीती, आणि अफवांचे माहोल थांबवण्यासाठी प्रशासनातर्फे तातडीने जनजागृती मोहीम सुरू करावी, रात्रीच्या वेळी स्थानिक पोलिस मित्रांची निवड करून त्यांची मदत घ्यावी अशीही मागणी स्थानिकांतून होत आहे.