जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव-नशिराबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एका अनोळखी तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
नशिराबाद पोलीस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मीनारायण हॉलजवळ पहाटे अंदाजे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अंदाजे ३५ वर्षीय असलेल्या या पादचारी तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पवार करीत आहेत.
मृत तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन
मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या नागरिकांनी नशिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.