नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : – नशिराबाद नगरपरिषदेमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याच्या मुद्द्यावरून शहरात चर्चा रंगू लागली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद रंधे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याची मागणी करत यापूर्वी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले होते.निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात लावण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीत मुख्याधिकारी यांच्या दालनात या महापुरुषांचे फोटो लावलेले होते. मात्र नव्या इमारतीतील दालनांमध्ये त्या प्रतिमा दिसत नसल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या नगरपरिषदेच्या सभागृहात महापुरुषांचे फोटो लावण्यात आलेले असले तरी त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा सहज प्रवेश होत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या प्रमुख दालनांमध्येही महापुरुषांच्या प्रतिमा असाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, निवेदनानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याचा आरोप करत आनंद रंधे व काही नागरिकांनी नगरपरिषदेत जाऊन महापुरुषांच्या प्रतिमा प्रशासनाला भेट स्वरूपात दिल्या. तसेच महापुरुषांच्या सन्मानाच्या बाबतीत होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात त्यांनी निषेधही नोंदविला.
नशिराबाद नगरपरिषद मुख्याधिकारी यांचा खुलासा.
याबाबत नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काही नागरिकांनी नगरपरिषदेला महापुरुषांचे फोटो भेट दिले आहेत. नगरपरिषदेच्या सभागृहात महापुरुषांच्या प्रतिमा आधीपासूनच लावलेल्या आहेत. मात्र प्रत्येक कॅबिनमध्ये फोटो लावण्याबाबतची मागणी असल्याने या विषयावर नगरपरिषदेच्या पुढील सर्वसाधारण सभेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, या घटनेमुळे नशिराबाद शहरात महापुरुषांच्या सन्मानाच्या प्रश्नावर विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे.

