नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या बदलीच्या हालचालींना वेग आला असून, नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांची बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून मंगळवारी सायंकाळी निर्गमित आदेशानुसार, सोनवणे यांची बदली नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायतीसाठी तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे.
सदर आदेशात नमूद केल्याप्रमाणे, ही बदली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेली असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या मूळ पदावर म्हणजेच नशिराबाद नगरपरिषदेवर पुनर्रुजू व्हावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राज्यभरात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली व नियुक्त्यांच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने ही बदली झाल्याचे सांगण्यात येत असून, स्थानिक स्तरावर या निर्णयाची चर्चा रंगली आहे. मुख्याधिकारी सोनवणे यांनी नशिराबाद नगरपरिषद क्षेत्रात मागील काही महिन्यांत विविध विकासकामे गतीने राबविल्याने त्यांची कार्यशैली चर्चेत होती.
या तात्पुरत्या बदलीमुळे नशिराबाद नगरपरिषदेच्या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, निवडणुकीनंतर ते पुन्हा मूळ पदावर रुजू होतील, असा आदेशातील स्पष्ट उल्लेख नागरिकांसाठी दिलासा देणारा आहे.

