Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषदेसाठी तयार होणाऱ्या अपूर्ण अवस्थेतील रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना अडचणी ; खडीमुळे...

नशिराबाद नगरपरिषदेसाठी तयार होणाऱ्या अपूर्ण अवस्थेतील रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना अडचणी ; खडीमुळे बैलांना होतोय त्रास

शेतकऱ्यांची नगरपरिषदेवर नाराजी ; रखडलेले काम मार्गी लावण्याची विनंती.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह – नुकतेच नशिराबाद नगरपरिषदेचे नव्या इमारतीचे लोकार्पण पार पडले असून, नव्या इमारतीत नगरपरिषदेचे कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात आले आहे. अल्पावधीतच नगपरिषदेला जाण्यासाठीच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हायवेपासून ते नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषद कार्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संबंधित रस्ता पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या रस्त्यावरून तयार केला जात असून सध्या खडीकरणाचे काम चालू आहे.

मात्र या कामाला झालेल्या विलंबामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या हंगामाचे दिवस सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी हाच मार्ग प्रमुख आहे. नगरपंचायत ते होमगार्ड ऑफिस पर्यंत काम पूर्ण झाले असून, दिवाळी निमित्त रस्त्याचे काम बंद अवस्थेत आहे. त्यामुळे रस्त्यावर पसरून ठेवलेल्या खडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, बैलगाड्या आणि शेती कामासाठी जाणाऱ्या जनावरांना चालण्यात अडचण येत आहे. तसेच दुचाकी वाहनांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, दिवाळी निमित्त काम बंद असून सुद्धा या रहदारीच्या रस्त्यावर खडी टाकून ठेवलेली आहे.ती खडी पसरून ठेवली असून, ती व्यवस्थित न दाबता तसेच पूर्ण रस्ता तयार न करता काम अधांतरी ठेवण्यात आलेलाआहे. त्यामुळे दररोज शेतात जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. “हंगामाचे दिवस सुरू असताना अशी परिस्थिती निर्माण होणे दुर्दैवी आहे,” अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीमुळे बैलांच्या खुरांना ईजा होत असून पशुधनाला याचा असह्य असा त्रास होत आहे.

याबाबत शेतकरी वर्गाने नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांना त्वरीत लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे, तसेच शेतकऱ्यांना सध्या जाण्या-येण्यासाठी तात्पुरती सोय करून द्यावी, अशी मागणी केली आहे. नशिराबाद परिसरातील नागरिक आणि शेतकरी वर्ग नगरपरिषदेकडून या समस्येवर तातडीने उपाययोजना करतील, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या