Thursday, March 26, 2026
police dakshta logo
HomeUncategorizedनशिराबाद नगरपरिषद निवडणूक विशेष : चारित्र्य पडताळणीला वेग, करभरणीत उसळी

नशिराबाद नगरपरिषद निवडणूक विशेष : चारित्र्य पडताळणीला वेग, करभरणीत उसळी

शहरात उमेदवार-नागरिक दोघांचीही धावपळ वाढली

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक जाहीर होताच शहरात राजकीय हालचालींसोबत प्रशासकीय कामकाजालाही वेग आला आहे. उमेदवारांच्या चारित्र्य पडताळणीपासून ते करभरणीपर्यंत सर्वच प्रक्रिया जलदगतीने होत असून, येत्या निवडणुकीत उच्चस्तरीय पारदर्शकता राखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवत आहे.नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलिस स्थानकात उमेदवारांच्या चारित्र्य पडताळणीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आतापर्यंत तब्बल १६२ उमेदवारांनी पडताळणी पूर्ण केली असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. संबंधित पडताळणीदरम्यान उमेदवारांचा गुन्हेगारी पूर्वइतिहास, प्रलंबित गुन्हे, सामाजिक कार्यातील सहभाग, वैध कागदपत्रांची तपासणी अत्यंत काटेकोरपणे करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दुसरीकडे, आगामी निवडणूक लक्षात घेता नशिराबादमध्ये करभरणीला अनपेक्षित वेग आला आहे. अनेक महिन्यांपासून थकीत असलेल्या घरपट्टी व विविध करांच्या देयकांसाठी नागरिकांनी कर कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. फक्त आठवडाभरात तब्बल १२ लाखांचा महसूल जमा झाल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज गोसावी व कर निर्धारण अधिकारी आझाद पटेल यांनी दिली.दहा प्रभागांतून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे संभाव्य उमेदवारही आपली थकबाकी तात्काळ निकाली काढण्यासाठी पुढे सरसावत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढलेली करभरणी ही केवळ निवडणुकीच्या हालचालींपुरती मर्यादित नसून नगरपरिषदेच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.

नशिराबादमधील या दुहेरी घडामोडी :- उमेदवारांची व्यापक पडताळणी आणि नागरिकांकडून वाढलेली करभरणी येणाऱ्या निवडणुकीत निर्माण झालेल्या उत्सुकतेचे चित्र स्पष्टपणे अधोरेखित करत आहेत. शहरात आता निवडणूक वातावरण तापले असले, तरी प्रशासनाची तयारी आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता ही निवडणूक अधिक शिस्तबद्ध व पारदर्शक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या