नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत. नगरसेवक पदासाठी एकूण ८४ उमेदवार, तर नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात कायम आहेत. अखेरच्या दिवशी ३० नगरसेवक आणि ४ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शितल राजपूत यांनी दिली. दरम्यान, प्रभाग क्र. २-ब मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराने अचानक अर्ज मागे घेतल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर नगराध्यक्ष पदाची मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरुद्ध भाजप-सेना महायुती अशी होण्याचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. शहरातील राजकीय वातावरण तापले असून दोन्ही पॅनेल अंतिम टप्प्यातील प्रचार रणनीती आखण्यात व्यस्त आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी योगेश पाटील विरुद्ध गणेश चव्हाण यांच्यात सरळ लढत
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ६ उमेदवार मैदानात आहेत. त्यात योगेश नारायण पाटील (भाजप-सेना महायुती), गणेश नथू चव्हाण (राष्ट्रवादी–अजित पवार गट), आशाबाई माळी (काँग्रेस), रोहित चौधरी (अपक्ष), देवेंद्र भंगाळे (अपक्ष), सय्यद शकील (अपक्ष), यांचा समावेश आहे. उमेदवारांची संख्या जरी जास्त असली तरी सरळ लढत भाजप-सेना युतीच्या पाटील आणि राष्ट्रवादीच्या चव्हाण यांच्यातच रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
अपक्ष उमेदवारांचे ४३ जणांचे अर्ज कायम..
या निवडणुकीत तब्बल ४३ अपक्ष उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली आहे. यापैकी काहींनी पक्षांतर्गत नाराजीमुळे बंडखोरी करत स्वबळावर उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे अनेक प्रभागांत त्रीकोनी व चतुर्भुजी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

