तीन नगराध्यक्ष पदाचे दावेदार असलेले कट्टर विरोधक अचानक एकाच गटात ; शिवसेना ठाकरे गटाची अचानक एन्ट्री तर बंडखोर-अपक्षांची स्वतंत्र आघाडी उभारण्याची तयारी.
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच नशिराबादचे राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रत्येक गटामध्ये तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. शहरात राजकीय हालचालींचा जलद वेग, बंद दाराआड बैठकांची मालिका आणि अनपेक्षित जुळवाजुळवी यामुळे संपूर्ण राजकारण अनिश्चिततेच्या उंबरठ्यावर उभे आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास आजपासून दिवसांत सुरुवात होत असल्याने, प्रत्येक गटामध्ये तिकीट आपल्यालाच मिळावे यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.
कट्टर विरोधक आता एकाच गटात…
गेल्या काही दिवसांपासून नगराध्यक्ष पदासाठी वेगवेगळ्या गटातून तीन नावे चर्चेत होती. पोस्टरबाजी, सोशल मीडियावरील प्रमोशन आणि स्वतंत्र प्रचाराचे फलक गावभर झळकत होते. समर्थक मात्र ‘आमचाच नगराध्यक्ष’ असा नारा देत होते. मात्र अचानक झालेल्या चर्चांमुळे चित्र पालटले! पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या तिन्ही दावेदारांनी एकाच गटात महायुतीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. स्वतंत्र आघाडीची भाषा करणारे नेते आता विकासाच्या नावाखाली हातमिळवणी केल्याचे दिसत आहे. यामुळे गावभर नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. सर्वच विरोधक एकत्र आल्याने आता नशिराबाद नगरपरिषदेत विरोधी पक्ष महायुती अस्तित्वात येऊ देणार का असा प्रश्न जनतेतून ऐकायला मिळत आहे. .“वेगळ्या झेंड्याखाली प्रचार करणारे आज एकत्र कसे?” असा प्रश्न मात्र आता जनता विचारात आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उसळली…
या जुळवाजुळवीचा सर्वाधिक फटका बसला तो जुन्या कार्यकर्त्यांना. अनेक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केले, प्रचार केले, बूथ बांधले; मात्र तिकीट दिले गेले ते नव्याने प्रवेश केलेल्या किंवा अचानक चर्चेत आलेल्या व्यक्तींना.
“काम आम्ही करायचं, पण तिकीट दुसऱ्याचं!”
अशी नाराजी अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसत आहे.काही प्रभागांमध्ये तिकीट निश्चित झाले, तर काही ठिकाणी अजूनही निर्णय गोंधळलेला आहे.यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. “नेमकं कोणत्या झेंड्याखाली उभं राहायचं?”
बंडखोर आणि अपक्षांची नवी आघाडी?
माहितीनुसार, महायुतीतून तिकीट न मिळालेल्या काही बंडखोरांनी आणि इच्छुक अपक्षांनी स्वतंत्र आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) सक्रिय भूमिका घेत असल्याची चर्चा आहे.या नव्या आघाडीमधूनच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवसेना ठाकरे गटाची कोठेही चर्चा नसतांना अचानक एन्ट्री…
यापूर्वी निवडणुकीसंदर्भात कुठेही उल्लेख नसलेल्या उभाठा शिवसेना या गटानेही आता बंडखोर व अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध शिवसेना ठाकरे गट मिळून बंडखोर-अपक्ष आघाडी असा मुकाबला दिसू शकतो.पहिल्याच नगरपरिषद निवडणुकीत नशिराबादमध्ये मोठे राजकीय उलटफेर होत असून, येणारे दिवस अधिक रंगतदार आणि नाट्यमय राहतील, यात शंका नाही. गावातील राजकीय रंगमंचावर आता “मैत्री, मतभेद आणि बंड” या तिन्हींचा थरार अनुभवल्या जाणार आहे.
आगामी दिवसांत चुरस वाढणार…
पहिल्याच नगरपरिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध बंडखोर – अपक्ष – ठाकरे गट असा थेट सामना दिसत आहे.
गावात जी समीकरणे बदलत आहेत, त्यावरून एक गोष्ट निश्चित ही निवडणूक केवळ राजकारण नाही, तर प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.l

