Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषद निवडणुकीची तयारी जोरात ; मतदार याद्यांतील घोळ चर्चेचा विषय! राजकीय...

नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीची तयारी जोरात ; मतदार याद्यांतील घोळ चर्चेचा विषय! राजकीय तापमान वाढले…

नशिराबाद | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दारात आल्या आहेत. पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, राज्य निवडणूक आयोगाने यासाठीची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर नशिराबाद नगरपरिषद क्षेत्रातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संभाव्य उमेदवारांकडून मतदार संपर्क मोहिमा सुरू झाल्या असून, सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये नव्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहरात ठिकठिकाणी प्रचार कार्यालयांची उभारणी, कार्यकर्त्यांच्या बैठका, तसेच गुप्त बैठकींची मालिका सुरू आहे. नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्या निवडणुकीसाठी नुकतीच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या याद्यांमध्ये अनेक घोळ आणि विसंगती उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मतदारांची नावे चुकीची नोंद झाल्याचे, काहींची नावे यादीतून वगळल्याचे, तर काहींची नावे दोन ठिकाणी आढळल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काही ठिकाणी एकाच घरातील पतीचे नाव एका वॉर्डांत तर पत्नीचे किंवा कुटुंबातील अन्य मतदाराचे नाव दुसऱ्याच वॉर्डांत असल्याचे दिसून आल्याने या पार्श्वभूमीवर मतदार आणि इच्छुक उमेदवारांनी यादीतील चुका तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. एकूण २८,६९२ मतदारांपैकी १४,९५६ पुरुष आणि १३,७३६ महिला मतदारांचा समावेश असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असले तरी अनेक प्रभागांत मतदारसंख्या संदिग्ध असल्याचे आढळून आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याची तयारी केली आहे. घोषणा होताच केवळ २१ दिवसांत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचे वृत्त आहे. सोमवारी किंवा मंगळवारी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून, त्यानंतर राज्यभर आचारसंहिता लागू होईल. राज्यात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका तत्काळ घेणे शक्य नसल्याचे काही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे प्राथमिक टप्प्यात नगरपालिका निवडणुका प्रथम घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती, तसेच स्थानिक विकासकामांची गती हेच मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत. शहरातील नागरिक या प्रश्नांबाबत सजग असून, संभाव्य उमेदवारांकडून ठोस भूमिका अपेक्षित करत आहेत. निवडणुकीच्या घोषणा होताच नगरसेवक होण्यासाठीची चढाओढ अधिकच तीव्र होणार आहे.नशिराबाद नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार याद्यांतील घोळांमुळे मतदार आणि उमेदवारांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. राजकीय रणशिंग फुंकले गेले असून, आता सर्वांच्या नजरा निवडणुकीच्या अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत.या होणाऱ्या निवडणुकीच्या घोषणेनंतर नशिराबाद नगरपरिषदेसह जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये राजकीय तापमान चांगलेच तापणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या