नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पेठ भागातील स्मशानभूमी परिसरात असलेल्या शहराच्या मुख्य पाणीपुरवठा विहिरीभोवती मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला होता. परिसरात साचलेली घाण, दुर्गंधी आणि दूषित वातावरणामुळे तसेच विहिरीच्या कठड्यावर उघड्यावर प्रातः विधीला लोक बसत असल्याने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता धोक्यात आली होती. विहिरीपासून केवळ पंधरा फुटांवर असलेल्या सार्वजनिक संडासमधील फुटलेल्या मैल्याच्या पाइपमधून मैला उघड्यावर वाहत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. या अस्वच्छतेमुळे टायफॉईड, अतिसार, कालरा यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
संपूर्ण विडिवी पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.👇🏻
आरोग्य विभागाने नगरपरिषदेला दिला होता तात्काळ स्वच्छता करण्याचा इशारा…
या गंभीर परिस्थितीची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद यांनी नगरपरिषदेला लेखी पत्राद्वारे तात्काळ उपाययोजना करण्याचा इशारा दिला होता. पाणीपुरवठा विहिरीचा परिसर स्वच्छ करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय तत्काळ करावेत, तसेच गरज भासल्यास विहिरीचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवावा, अशा स्पष्ट सूचना आरोग्य विभागाने दिल्या होत्या.
नागरिकांनी केली चिंता व तातडीच्या कारवाईची मागणी…
विहिरीभोवती निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. “शहरातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताभोवती अशी दुर्लक्षाची स्थिती असू नये,” अशी मागणी नागरिकांनी केली होती. नगरपरिषदेनं तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आली होती.
पोलिस दक्षता लाईव्हच्या वृत्ताला तातडीची दखल; नगरपरिषदेची तत्पर प्रतिक्रिया…
या गंभीर प्रकरणावर ‘पोलिस दक्षता लाईव्ह’ यांनी वस्तुस्थिती मांडत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नशिराबाद नगरपरिषद प्रशासनाने तातडीने कारवाई केली. विशेषतः अभियंता शुभम जाधव साहेब यांनी तात्काळ जागेची पाहणी करून नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे आदेश दिले. केवळ २४ तासांच्या आत स्वच्छता मोहीम सुरू करून स्मशानभूमी परिसरासह विहिरीभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. नगरपरिषदेचे अधिकारी, स्वच्छता कर्मचारी व संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून परिसरातील अस्वच्छता दूर केली. या जलद प्रतिसादामुळे नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला असून, पोलिस दक्षता लाईव्हच्या वृत्तामुळे जनहिताचा विषय त्वरित मार्गी लागल्याचे नमूद केले जात आहे.
नगरपरिषदेच्या तत्परतेचे कौतुक...
या संपूर्ण कारवाईबद्दल पोलिस दक्षता लाईव्ह तर्फे नशिराबाद नगरपरिषदेचे अधिकारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषयावर जलदगतीने कार्यवाही करून प्रशासनाने दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.