Tuesday, October 21, 2025
police dakshta logo
Homeनशिराबादनशिराबाद नगरपरिषद निवडणुक ; आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर होणार.

नशिराबाद नगरपरिषद निवडणुक ; आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर होणार.

नशिराबाद | मुख्य संपादक चंदन पाटील। पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले असून, निवडणुकी संदर्भातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रभागनिहाय आरक्षण सोडत आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे.आज ८ ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी 2 वाजता लेवा पंच हॉल, जुने नगरपरिषद सभागृह सुनासगाव रोड, नशिराबाद येथे ही आरक्षण सोडत जाहीर होणार असून, त्यामुळे नशिराबादच्या राजकीय वातावरणात चैतन्य संचारण्यास सुरुवात झाली आहे.

या निवडणुकीसाठी नशिराबाद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण यापूर्वीच निश्चित करण्यात आले असून, ते ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे ओबीसी उमेदवारांसाठी नगराध्यक्षपदाची दारं खुली झाली असून, अनेक उमेदवारांनी यासाठी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज रोजी होणाऱ्या प्रभागनिहाय सदस्य पदांच्या आरक्षणावर सगळ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आरक्षण सोडतीचे आयोजन नगरपरिषदेच्या सभागृहात करण्यात आले असून, या प्रक्रियेसाठी जळगांवचे प्रांत अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी ही माहिती दिली असून, सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे आणि नियमानुसार पार पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोणत्या प्रभागात कोणत्या प्रवर्गासाठी जागा राखीव असणार, यावर अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय गणित ठरणार आहे. त्यामुळे ही सोडत उमेदवारीची दिशा निश्चित करणारी ठरणार आहे. अनेक राजकीय पक्षांनी आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे, मात्र आरक्षणानुसार ही रणनीती कशी वळण घेईल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी हा टप्पा अत्यंत निर्णायक मानला जात असून, आरक्षणानंतर निवडणुकीची रणधुमाळी अधिक तीव्र होणार आहे. कोणत्या प्रभागात कोण पुढे सरसावतो, कोण मागे पडतो, याची दिशा याच आरक्षण सोडती नंतर स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या