नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या उदासीन कारभारामुळे भर पावसाळ्यात द्वारका नगर व महात्मा फुले नगर परिसरातील नागरिकांचे हाल होत असून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीय भूमिकेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
द्वारका नगरातील गट नंबर ६/१ मधील रस्ता १९८३ साली ऐवजीकरण होऊनही आजपर्यंत तयार झालेला नाही. पावसाळ्यात या रस्त्यावरून वयोवृद्ध आणि लहान मुलांना चालणे कठीण झाले आहे. चिखल व पाणथळामुळे कचरा गाडी येणेही अशक्य झाले आहे. इतर सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झालेले असताना, रामदेवजी बाबा मंदिराकडील पूर्व व दक्षिण बाजूचा रस्ता मात्र नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे अद्याप अपूर्ण आहे.

स्थानिक रहिवाशी संताप व्यक्त करताना:
“या भागात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले असून गुराढोरांच्या गोठ्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. नगरपरिषदेनं तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिक रहिवाशी अनिल पाटील यांनी केली.
“अनेक वेळा निवेदन दिले तरी नगरपरिषदेनं कानाडोळा केला. पावसाळ्यात चालणेसुद्धा अवघड होते,” अशी खंत माजी सैनिक लक्ष्मण राऊत यांनी व्यक्त केली.
“रस्ता काँक्रीटीकरण तातडीने करून वयोवृद्ध व लहान मुलांचा विचार करावा,” अशी मागणी स्थानिक रहिवाशी मनोज पाटील यांनी केली.
“घराच्या बाहेर निघणेही कठीण झाले आहे, त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत,” अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशी विजय पाटील यांनी दिली.
दरम्यान, महात्मा फुले नगर व प्लॉट एरिया परिसरातील रस्त्यांचीही परिस्थिती बिकट असून, नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा लेखी निवेदन देऊनही नगरपरिषद व स्थानिक प्रतिनिधींनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. काही दिवसांपूर्वी रहिवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांनी नगरपरिषदेला निवेदन दिले होते. मात्र नगरपरिषदेकडून पुन्हा एकदा ‘केराची टोपली’ दाखवत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
या भागातील संतप्त रहिवाश्यांतर्फे “आता प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल” असा इशारा देण्यात आला आहे

