नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी योगेश पाटील (पिंटू शेठ) यांनी सोमवारी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारताच शहराच्या नव्या कारभाराची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व परमपूज्य झिपरु अण्णा महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पदभार स्वीकारल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरपरिषद प्रांगणात वृक्षारोपण करून “नवीन नगरपरिषद, नवे प्रतिनिधी आणि नवी सुरुवात” असा पर्यावरणपूरक संदेश दिला. विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचीही जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असा नवा संकल्प यावेळी त्यांनी मांडला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरपरिषदेचा कारभार लोकाभिमुख पद्धतीने राबविल्यास नशिराबादचा विकास आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यापूर्वीप्रमाणेच पुढील काळातही निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, तसेच शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना निवड प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकदिलाने शहराच्या विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर योगेश पाटील यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांनुसार नशिराबादचा सर्वांगीण व समावेशक विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचा कारभार पारदर्शक व नागरिकाभिमुख पद्धतीने चालविण्यात येईल, असे सांगत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यास नवनिर्वाचित नगरसेवक कोमल नारखेडे, पंकज महाजन, लीना महाजन, मनोज पाटील, हिना कासार, सय्यद वासीफ अली, शाह हनीफा, शेख असलमोद्दिन, शैला व्यवहारे, कीर्तीकांत चौबे, सुवर्णा महाजन, लालचंद पाटील, जनाबाई रंधे, चेतन बऱ्हाटे, शेख नसरीन बानो, मोहम्मद इक्बाल शेख, कमरूनिसा सय्यद, आसीफ शेख, भारताबाई धनगर, विकास पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

