नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शुक्रवार, दि. १९ डिसेंबर रोजी ‘नशामुक्ती’ या गंभीर विषयावर विद्यार्थ्यांसाठी सविस्तर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांधरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती संगीता बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या नशायुक्त पदार्थांचे दुष्परिणाम, त्यांचे शरीरावर होणारे घातक परिणाम तसेच नशेच्या सेवनामुळे उद्भवणारे शारीरिक व मानसिक आजार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. नशेच्या आहारी गेल्यास शारीरिक व मानसिक विकासात कशाप्रकारे अडथळे निर्माण होतात, याचेही स्पष्ट व समजेल अशा शब्दांत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तुषार राणे व डॉ. संगीत जोशी यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आरोग्य सहाय्यक श्री. लुकमान तडवी, आरोग्य सेवक श्री. दीपक तायडे व श्री. राजाराम पाचपांडे हेही उपस्थित होते.या नशामुक्ती मोहिमेला न्यू इंग्लिश हायस्कूलच्या संपूर्ण शिक्षकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात लक्षपूर्वक सहभाग घेत नशामुक्त जीवनाचा संदेश आत्मसात केला.

