Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव कृष्णमय वातावरणात साजरा

नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव कृष्णमय वातावरणात साजरा

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक जनार्दन माळी उपस्थित होते. मंचावर संस्थेचे संचालक राजेश पाटील, ॲड. प्रदीप देशपांडे, माध्यमिक मुख्याध्यापिका सुनिता बनसोडे, उपशिक्षक जितेंद्र महाजन तसेच प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिमेचे पूजन व आरतीने झाली. त्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी “कृष्ण जन्माला या” या गीतावर नृत्य सादर केले तसेच पाळणा गीताने संपूर्ण वातावरण भक्तिरसात रंगून गेले. यानंतर बालगोपाळांनी कृष्णचरित्रातील विविध प्रसंग सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यात माखनचोर, होली, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत, राधा-गोपिका नृत्य आणि रासलीला या लीलांचा समावेश होता. तसेच कृष्ण-सुदाम भेट हा प्रसंगही रंगविण्यात आला. या उत्सवात कृष्णसवंगड्यांनी एकत्र येऊन दहीहंडी फोडली आणि दहिकाल्याचा प्रसाद वाटून आनंदोत्सव साजरा केला. या कृष्णलीलांमुळे संपूर्ण शाळा परिसर नंदनवन झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भोळे व पूजा पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनिता शिवरामे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन वैशाली भोळे, भावना भावसार, सुनिता शिवरामे व आशा इसाने यांनी केले असून सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या