नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सर्व्हिस रोडवरील पार्श्वनाथ पेट्रोल पंपावर बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता पेट्रोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाचा पंपावरील कर्मचारी यांच्यात वाद झाला. पाहता पाहता हा वाद चिघळला आणि थेट हाणामारीत परिवर्तित झाला. तरुणानं गावातील मित्र व नातेवाइकांना बोलावल्याने पंपावर मोठा जमाव जमा झाला. यामध्ये पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणले. मात्र चौकशीदरम्यान पोलिस स्थानकात दोन्ही गटातील नातेवाईक व समर्थकांची मोठी गर्दी उसळली. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांनी लाठ्यांचा वापर करून जमावाला पांगवले. या वेळी उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात आरडाओरड केली.मारहाणीबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक आत्माराम मनोरे यांनी दिली. घटनेचा संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, घटनाबाबत माहिती घेण्यासाठी पत्रकार पोलिस ठाण्यात पोहोचले असता काही पोलिसांनी पत्रकारांशी अरेरावीची वागणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा नशिराबाद पत्रकार मंचाने जोरदार निषेध नोंदवला आहे.

