नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अडीचशे वर्षांची परंपरा जपत नशिराबाद येथे याही वर्षी बैलपोळा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या पोळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे बैलांची शर्यत. वाकी नदीपलीकडील ऐतिहासिक कल्याण बुरुजापासून विठ्ठल मंदिराजवळील गाव दरवाजापर्यंत ही शर्यत पार पडते. गाव दरवाजात सर्वप्रथम पोहोचणारा बैल विजयी ठरविला जातो. विजेत्या बैल मालकास मानाचा फेटा, तर बैलास पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून सन्मान केला जातो.
लॅम्पी आजाराचे संकट ; पण पोळा उत्साहात साजरा
यंदा लॅम्पी आजाराचे संकट असतानाही मोठ्या उत्साहात ही शर्यत पार पडली. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पीक संरक्षण सोसायटीचे अध्यक्ष डिगंबर रोटे यांनी बंदुकीचा बार फोडत शर्यतीची सुरुवात केली. याही वर्षी खालची आळी माळीवाडा येथील बाळू नारखेडे यांच्या बैलाने दमदार कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला. विजयानंतर नागरिकांनी जल्लोष केला.
पोळ्यानिमित्त नशिराबाद नगरीला यात्रेचे स्वरूप
ढोल-ताशांच्या गजरात, विठ्ठल मंदिराच्या ओट्यावर झालेल्या कार्यक्रमात जि.प.माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन, किरण पाटील, विनोद रंधे, मुकुंदा रोटे, तुळशीराम येवले, चंदू पाटील, मनोज पाटील, गणेश नारखेडे, अरुण भोई, सोसायटी सदस्य व पोळा उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. पोळ्यानिमित्त नशिराबाद नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहराबाहेर कामानिमित्त वास्तव्यास असलेले गावकरीसुद्धा यावेळी मोठ्या संख्येने पोळापाण्यासाठी दाखल झाले होते. शर्यतीदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सायंकाळी बैलांची बाशिंग बांधून मिरवणूक
सायंकाळी बैलांची बाशिंग मिरवणूक काढण्यात आली. शेतकरी राजांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. वाद्यवृंदाच्या साथीने पारंपरिक नृत्य करून बैलांच्या विजयाचा गौरव करण्यात आला. त्यामुळे नशिराबादचा पोळा हा जळगाव जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्सव ठरला.
शिवशंकर-हनुमान दर्शनाची परंपरा
पोळ्यानिमित्त सर्जाराज पूजन, आरती, शेती अवजारांचे पूजन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य देऊन बैलजोडींना शिवशंकर व हनुमान मंदिरात नेण्याची परंपरा यावर्षीदेखील पाळली गेली.
शर्यतीत खड्ड्यांचा अडथळा
शर्यत मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचा त्रास जाणवला. नगरपरिषदेकडून आदल्या दिवशी केलेल्या मलमपट्टीत काही ठिकाणी मुरूम व्यवस्थित न पसरल्याने शर्यत मार्गावर अडथळे निर्माण झाले. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.