नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- खाकी वर्दीतील कडक शिस्त आणि माणुसकीचा ओलावा यांचा दुर्मिळ संगम साधणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) योगिता मधुकर नारखेडे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्याचा आज पदभार स्वीकारला. त्यांच्या आगमनाने पोलीस ठाण्याच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ, महिला वर्ग व पोलीस बांधवांकडून पुष्पगुच्छ, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. एका महिला अधिकाऱ्याला मिळालेला हा ‘ग्रँड वेलकम’ जिल्ह्यातील दुर्मिळ प्रसंग मानला जात आहे.
‘कसोदा पॅटर्न’ची नशिराबादमध्ये एन्ट्री.
२०२३ ते २०२४ या कालावधीत कसोदा (ता. एरंडोल) पोलीस ठाण्यात कार्यरत असताना API नारखेडे यांनी गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करताना सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकून घेणारी कार्यपद्धती रुजवली होती. त्यांच्या बदलीवेळी कसोदा ग्रामस्थांनी रथातून, बँडच्या तालावर आणि जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करत दिलेला निरोप आजही पोलीस दलात चर्चेचा विषय आहे. याच ‘कसोदा पॅटर्न’ची अपेक्षा नशिराबादकरांनी त्यांच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी व्यक्त केली. नशिराबादकरांनी त्यांचे स्वागत बँडच्या गजरात केले. तसेच नशिराबाद पोलीस कर्मचारी आणि काही नवनियुक्त नगरसेविका यांनी त्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अशा प्रकारे एक महिला API चे पहिल्याच दिवशी पदभार स्वीकारतांना केलेले स्वागत हा संपूर्ण जिल्हाभरात एक चर्चेचा विषय ठरला.
संवेदनशील ठाणे, मोठे आव्हान.
महामार्गालगत वसलेले नशिराबाद पोलीस ठाणे कायदा-सुव्यवस्थेसह वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने संवेदनशील मानले जाते. वाढती वर्दळ, गुन्हेगारी रोखणे, तसेच पोलीस-जनता यांच्यात विश्वासाचा दुवा मजबूत ठेवणे ही येथील प्रमुख आव्हाने आहेत. मात्र, अनुभवी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या API नारखेडे यांच्या नियुक्तीमुळे “आता कायद्याचा धाक राखत नागरिकांची मने जिंकणारी कार्यशैली येथेही पाहायला मिळेल,” अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
नवे पर्व, नवी आशा..
पोलीस व जनता यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करताना कायदा-सुव्यवस्थेला नवे बळ देण्याची जबाबदारी आता API योगिता नारखेडे यांच्यावर आहे. त्यांच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले असून, नशिराबाद पोलीस ठाण्यात ‘स्त्रीशक्ती’चा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

