नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलिस स्टेशनतर्फे शहरातील मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक आज (दि. ३१ ऑगस्ट) सायंकाळी घेण्यात आली.
या बैठकीत पोलिसांकडून सर्व मंडळांना शांतता राखून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वाद्य व गुलालाचा वापर करण्यास सक्त मनाई असल्याने त्याचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. यावेळी मंडळांना मार्गदर्शन करताना गणेश मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी किमान एक किंवा दोन पदाधिकारी उपस्थित राहावेत, जेणेकरून मूर्तीची विटंबना होणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या.
सदर बैठक सायंकाळी ६.४५ वाजता सुरू होऊन ७.३५ वाजता संपन्न झाली. बैठकीस ६० ते ७० मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.