नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) योगिता मधुकर नारखेडे यांनी आज तातडीची पोलीस पाटील बैठक आयोजित केली. आगामी ३१ डिसेंबर (थर्टी फर्स्ट) उत्सव तसेच लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत सर्व पोलीस पाटलांना त्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या स्पष्टपणे समजावून सांगण्यात आल्या. आपल्या-आपल्या गावपातळीवर घडणाऱ्या प्रत्येक संशयास्पद हालचालींची तत्काळ माहिती पोलीस प्रशासनाला देणे, कोणताही अनुचित प्रकार, बेकायदेशीर दारूविक्री, जुगार, अवैध धंदे तसेच समाजकंटकांच्या हालचाली याबाबत दक्ष राहण्याचे निर्देश API नारखेडे यांनी दिले. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर तरुणाईकडून होणाऱ्या गोंधळ, दारू पिऊन वाहन चालविणे, छेडछाड, वादविवाद व कायदा मोडणाऱ्या प्रकारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अशा प्रकारांवर वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस पाटलांनी गावोगावी शांतता समित्या सक्रिय ठेवाव्यात, नागरिकांमध्ये जनजागृती करावी व कुठलाही तणाव निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले.
याचप्रमाणे, होऊ घातलेल्या झेडपी व पंचायत समिती निवडणुकांच्या काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन, कुठल्याही प्रकारचे प्रलोभन, धमकी, बोगस मतदान, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रकार होणार नाहीत यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले. बैठकीच्या शेवटी API योगिता नारखेडे यांनी, पोलीस पाटील हे प्रशासनाचे गावपातळीवरील महत्त्वाचे दुवा असल्याचे नमूद करत, शांतता, सुव्यवस्था व लोकशाही प्रक्रियेचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले. या बैठकीमुळे आगामी सण-उत्सव व निवडणूक काळात नशिराबाद परिसरात शांततेचे वातावरण राखण्यासाठी ठोस नियोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले.

