नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद गावातील मुख्य रस्ता, ज्या मार्गावरून दरवर्षी गणेश बाप्पाची आगमन व विसर्जन मिरवणूक भव्यतेने पार पडते, तोच रस्ता आज खड्ड्यांनी पोखरला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला नगरपरिषदेने केलेली डागडुजी पावसाच्या पहिल्याच सरींमध्ये वाहून गेली असून रस्ता पुन्हा खड्ड्यांनी गच्च भरला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला थेट सवाल केला आहे की, “गणपती बाप्पाच्या स्वागताची मिरवणूक ही खड्ड्यांच्या आरासीतूनच काढायची का?”
नगरपरिषदेकडून भूमिगत गटारींचा प्रस्ताव असल्याचे सांगून रस्ते बनविणे शक्य नसल्याचे कारण पुढे केले जाते. मात्र ग्रामस्थांचा संताप वाढत असून, “प्रस्तावांच्या नावाखाली अजून किती वर्षे खड्ड्यातूनच चालायचं?” असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
फक्त मेन रोड नव्हे, संपूर्ण गाव खड्डेमय!
मेन रोडचीच नव्हे तर संपूर्ण गावातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. भवानीनगर परिसरात वाकी नदी पुलाजवळील रस्त्यावर २० ऑगस्ट रोजी दुचाकी घसरून एका महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या अपघातात हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रस्त्यांच्या धोकादायक स्थितीची साक्ष देणारी ठरली आहे. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, फक्त डागडुजीवर लाखो रुपये उधळण्यापेक्षा कायमस्वरूपी दर्जेदार रस्ते करण्याची हिंमत प्रशासनाने दाखवावी.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर गणेशोत्सवाच्या काळात प्रशासनाने रस्त्यांची सुधारणा केली नाही तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील, असे नागरिक ठामपणे सांगत आहेत.