कंडारी येथून महिलेस घेतले होते ताब्यात ; महिलेचा सोशल मीडियावरील व्हिडिओ फेक असल्याचे निष्पन्न..
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गेल्या काही दिवसांपासून नशिराबाद परिसरात पसरलेल्या एका विचित्र आणि भीतीदायक रिंगण बाहुली प्रकरणाने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी एक वयोवृद्ध महिला रस्त्यावर रिंगण घालून त्यात बाहुली ठेवते, असा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. यासंबंधी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गावात अंधश्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि पालकांमध्ये भीती पसरली आहे.सदर व्हिडिओमध्ये एका महिलेस रस्त्यावर रिंगण घालून त्यात बाहुली ठेवताना दाखवण्यात आले होते. त्यामुळे ही अघोरी कृत्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ए.सी. मनोरे स्वतः या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.
कंडारी येथे पकडण्यात आलेली ती महिला बेडी-भीक मागणारी..
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कंडारी परिसरात एक महिला नागरिकांना संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आली. तीच महिला नशिराबाद प्रकरणातील असल्याचा नागरिकांचा समज झाला होता. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सदर महिला मंगला बुद्रुक जोशी, रा. शेंगोळा, ता. जामनेर, जि. जळगाव ही असून ती श्रावण महिन्यात गावोगावी जाऊन “भेट-बेडी” मागत असते. ती रिंगण काढणारी महिला नसून, व्हायरल व्हिडिओमधील महिलेचा तिच्याशी काहीही संबंध नाही, असे नशिराबाद पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सोशल मिडियावरील कोणत्याही चुकीच्या व्हिडिओ किंवा फोटो मुळे एखाद्या निरअपराधी व्यक्तीला याची किंमत मोजावी लागेल. तरी चुकीच्या पद्धतीने कोणाचाही फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून कोणाच्या जीविताची न खेळण्याचा इशारा नशिराबाद पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.
या घटनेचा सूत्रधार अद्यापही पडद्याआड ; नशिराबाद मधील होणाऱ्या चोऱ्यांचा या घटनांशी काही संबंध आहे का?
सदरहून या सोशल मीडियाच्या व्हायरल व्हिडिओमुळे ज्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले ती बेडी- भिक मागणारी असून तिचा या घटनेची काही एक संबंध नाही. तिला कंडारी येथे अटक झाली त्याच वेळेस आज सकाळी भवानीनगर येथे परत एक नवीन रिंगण बाहुली खेळ पहावयास मिळाला. यावरून स्पष्ट होते की ती महिला जर कंडारीत होती तर एकाच वेळेस नशिराबाद येथे कशी असू शकते. यावरून त्या महिलेचा या घटनेचे काही संबंध नसल्याचे स्पष्ट होते. तरी या घटनेमागील खरा सूत्रधार कोण तो अजून पडद्याआडच असून त्याचा तपास मात्र लागायला हवा. यामागे त्याचा काही कट आहे का हे लक्षात घ्यायला हवे. कारण नशिराबाद मध्ये जेव्हापासून हा रिंगण बाहुली खेळ सुरू झाला तेव्हापासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून गावात बॅटरी चोरांनी उच्छाद मांडला होता, बॅटरी चोर प्रकरण ताजे असतानाच त्यातच भर की काय? बुधवारी रात्री नशिराबाद येथील प्रकाश बोंडे यांची बोलेरो गाडी चोरीला गेली असून दुसऱ्या एक बोलेरो गाडीचा चोरीचा प्रयत्न फसला. तर दुसऱ्या घटनेत मुक्तेश्वर नगर मधील भगवान रूपचंद नाथ यांच्या घरात चोरी झालेली आहे. यावरून ह्या घटना संशयास्पद वाटत आहेत. या घटनांची रिंगण बाहुली प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास लागायलाच हवा अशी मागणी जोर धरू लागली आहे. तपासादरम्यान पोलिसांना गावातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळाले असून, त्यामध्येही कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. तरी देखील पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू ठेवला आहे.
नशिराबाद येथील ती भाडेकरू महिला निरअपराध:
या प्रकरणात नशिराबादमधील एका भाडेकरू महिलेलाही संशयाच्या भोवऱ्यात ओढण्यात आले होते. मात्र ती महिला चतुर्मासानिमित्त पंढरपूर येथे गेल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदभाऊ रोटे यांनी दिली असून, तिच्यावरचा संशय फोल ठरला आहे. माजी सरपंच पंकज महाजन यांनीही नागरिकांना आवाहन केले होते की, कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
या घटनेचा चुकीचा व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यास नशिराबाद पोलीस कारवाई करणार..
या संपूर्ण प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये भीती व संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिकांनी शांतता व संयम राखावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच अशा अफवांच्या आहारी न जाता प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करताना पडताळणी करावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.