नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे महिला शेतकऱ्यांसाठी कापूस पिकावर आधारित शेती शाळेचे आयोजन दिनांक 31 जुलै रोजी करण्यात आले होते. किरण देविदास चौधरी यांच्या कापसाच्या शेतात पार पडलेल्या या शाळेत ३० महिलांनी सहभाग नोंदवला. शेती शाळेची सुरुवात पारंपरिक प्रार्थना व “ICM टाळी” ने उत्साहात झाली.
या प्रशिक्षण कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती मनिषा कोंघे यांनी महिलांना बियाण्यांची योग्य निवड, बीज प्रक्रिया, बीज उगम चाचणी यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले. कापूस पिकातील शत्रू व मित्र कीड यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांच्या ओळखीबाबत सखोल माहिती दिली.मंडळ कृषी अधिकारी पी. डी. घोडके यांनी माती परीक्षण आणि खत व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. तर श्रीमती संगीता सोनवणे यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या सुरक्षितता उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे “बॅलेट बॉक्स टेस्ट” – यामध्ये सहभागी महिलांनी शत्रू व मित्र कीड यांची ओळख किती आहे, हे स्व-परिक्षणाच्या स्वरूपात अनुभवले. महिलांनी स्वतः कापूस पिकाचे निरीक्षण करत कीडींची ओळख शिकून घेतली.हा उपक्रम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी देसले मॅडम तसेच तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे महिला शेतकरी सक्षम होत असून शाश्वत शेतीकडे एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे, असे मत सहभागी महिलांनी व्यक्त केले.