संगीत श्रीमद् भागवत महापुराण कथा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर तसेच श्री गणेश महादेव शिवलिंग नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य ‘संगीत श्रीमद् भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी या सोहळ्याचा शुभारंभ होणार असून ४ मार्च २०२६ रोजी कथेची सांगता होणार आहे.सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक पर्वात दररोज विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० ते ६.३० काकड आरती, सकाळी ७ वाजता विष्णुसहस्रनाम, सायंकाळी ४.३० ते ५.३० हरिपाठ तर रात्री ७.३० ते ११ या वेळेत भव्य श्रीमद् भागवत कथा पार पडणार आहे. भागवत कथेचे निरूपण ह.भ.प. सुनील शास्त्री महाराज (नशिराबादकर) यांच्या समृद्ध वाणीतील होणार असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

४ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेची सांगता देखील याच दिवशी करण्यात येणार आहे.या पवित्र सोहळ्यानिमित्त दररोज विविध धार्मिक विधी पार पडणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वासुदेव नामदेव माळी तसेच समस्त माळी पंच मंडळ, वरची आळी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“समस्त ग्रामस्थ माळी पंच मंडळाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर तसेच श्री गणेश महादेव दिनानिमित्त प्रथम वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने संगीत श्रीमद् भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कथेचे व महाप्रसादाचे यजमान वैकुंठवासी नामदेव लाहनु माळी व वै. सौ. इंदुबाई नामदेव माळी यांच्या प्रित्यर्थ वासुदेव नामदेव माळी यांच्या पुढाकारातून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.”

