नशिराबाद | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू शाळेत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा आणि त्यांचे सहकारी शकील शेख मुसा या दोघांविरोधात शुक्रवारी (२७ जून) रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील प्रशासनाधिकारी शुक्रवारी (२७ जून) दुपारी २ वाजता के.एस.टी. उर्दू शाळेच्या तपासणीसाठी (इन्स्पेक्शन) गेले होते. त्यावेळी शाळा बंद होती आणि शाळेला कुलूप लावलेले होते. यामुळे रागिणी चव्हाण यांच्या सहकारी सरला पाटील यांनी मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा आणि शकील शेख मुसा (दोघे रा. नशिराबाद) यांना फोन करून शाळेत येण्यास सांगितले.
मात्र, दोघांनीही शाळेत येण्यास स्पष्ट नकार दिला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकारामुळे प्रशासकीय कामात व्यत्यय निर्माण झाला. सरला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नशिराबाद पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा आणि शकील शेख मुसा यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.