नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीनंतर मतमोजणीस विलंब झाल्याने मतपेट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनला आहे. नागपूर खंडपीठाच्या निर्देशांनुसार राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत नशिराबाद नगरपरिषदेतील सर्व मतदान यंत्रणा आणि मतपेट्या होमगार्ड प्रशिक्षण केंद्रातील स्ट्राँग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात सीलबंद करून ठेवण्यात आल्या आहेत.
२४ तास सीसीटीव्ही नियंत्रण…
स्ट्राँग रूम परिसरात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिवस-रात्र नजर ठेवली जात आहे. प्रत्येक हालचालीचे थेट निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षातून सतत मॉनिटरिंग सुरू असून, कोणताही बदल तात्काळ रेकॉर्ड होईल अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे.यासोबतच SRP ची विशेष पथकं परिसरात नियमित गस्त घालत असून पोलिसांनी तिहेरी सुरक्षा वर्तुळ तयार केले आहे. स्ट्राँग रूमकडे जाणारे सर्व मार्ग बंद करून प्रवेश फक्त अधिकृत व्यक्तींनाच दिला जात आहे.
मतमोजणीपूर्व तयारी पूर्ण
मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनाने मनुष्यबळ, साहित्य, नियंत्रण उपाययोजना यांचे नियोजन आगाऊ पूर्ण केले आहे. परिसरात मोबाईल जामर बसवावे अशी मागणी काही उमेदवारांकडून करण्यात आली असून तीही विचाराधीन आहे.
उमेदवारांच्या प्रतिनिधींकडूनही २४ तास निगराणी..
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), आणि विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनीही स्वतःच्या प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे.प्रत्येक गटाकडून तीन ते पाच सदस्य प्रशासनाकडून अधिकृत परवानगी घेऊन स्ट्राँग रूमभोवती २४ तास पहारा देत आहेत. हे सर्व प्रतिनिधी आलटून-पालटून प्रत्येकी आठ तासांची ड्युटी बजावत असून प्रशासनाबरोबर उमेदवारांचाही तितक्याच कडकपणे सहभाग आहे.
जिल्ह्यातील सर्व स्ट्राँग रूमवर करडी नजर..
जिल्ह्यातील १६ नगरपरिषद आणि २ नगरपंचायत क्षेत्रांतील स्ट्राँग रूमवरही चारही बाजूंनी सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात आले आहे. सर्व कॅमेऱ्यांचा थेट फीड संबंधित तहसीलदारांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच स्थानिक व बाहेरील अशा सहा शस्त्रसज्ज कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे.

