जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादच्या वतीने दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या सेवा पंधरवाडा अंतर्गत आज “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” या उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
शिबिराचे दीपप्रज्वलन माननीय जळगाव लोकसभा मतदार संघाच्या खासदर स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, तहसीलदार शीतल राजपूत, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, जनआरोग्य समिती सदस्य डॉ.प्रमोद आमोदकर, डॉ.नजरूल इस्लाम, तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते न्यू इंग्लिश स्कूलचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, माजी उपसरपंच किर्तीकांत चौबे, मनसे जिल्हा अध्यक्ष मुकुंदा रोटे, व शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्मान गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून एकूण २२४ लाभार्थींनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
तपासणी व उपचार सेवा पुढीलप्रमाणे राबवण्यात आली:
रक्तक्षय तपासणी – २८ लाभार्थी.
असंसर्गजन्य आजार तपासणी व औषधोपचार.
लसीकरण सेवा – ४७ लाभार्थी.
आयुष्मान गोल्डन कार्ड काढणे – १५५ लाभार्थी.
क्षयरोग तपासणी – १० लाभार्थी.
डेंग्यू/मलेरिया तपासणी – १५ लाभार्थी.
कॅन्सर तपासणी.
मोतीबिंदू तपासणी – ३७ लाभार्थी.
याशिवाय मोफत औषधोपचार व आवश्यक ते संदर्भ सेवा लाभार्थींना पुरवण्यात आले. शिबिराच्या सुवर्ण क्षणी रेड प्लस ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले, ज्यामध्ये १५ जणांनी रक्तदान केले.
सदर आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव जाधव व डॉ.अजयपाल सिंग यांच्या माध्यमातून करण्यात आले. शिबिरात सहभाग घेतलेले सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयं सेविकांनी कार्यशक्तीने योगदान दिले. शिबिराला गावातील व परिसरातील नागरिकांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व समजून घेतले.