Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद-उमाळा रोडवर उर्दू शाळेजवळ गटारीचे पाणी रस्त्यावर ; दुचाकी स्लिपचे प्रमाण वाढले,...

नशिराबाद-उमाळा रोडवर उर्दू शाळेजवळ गटारीचे पाणी रस्त्यावर ; दुचाकी स्लिपचे प्रमाण वाढले, पायी चालणेही धोकादायक!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद-उमाळा रोडवरील के.एस.टी. उर्दू शाळेजवळ गटारीचे पाणी थेट रस्त्यावर वाहू लागल्याने या परिसरात वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सतत वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रस्ता खचला असून चिखल साचल्याने दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.

नशिराबाद–उमाळा रोड हा अवजड वाहतूक तसेच अवैध खनिज वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. याच रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, शेतकरी, बैलगाड्या तसेच औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी दिवसरात्र प्रवास करीत असतात. मात्र सध्या या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. उताराच्या भागात, मशिदीजवळ व उर्दू शाळेच्या बाजूच्या गटारीतील पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सततच्या पाण्यामुळे डांबरीकरण निखळले असून दगड-मातीचे थर उघडे पडले आहेत. या परिस्थितीत रस्त्यावर पायी चालण्यासाठी जागाच उरलेली नसून समोरून वाहन आल्यास बाजूला थांबणेही अशक्य होत आहे. रात्री अंधारामुळे चिखल व खचलेला रस्ता न दिसल्याने अनेक वाहनचालकांच्या दुचाकी स्लिप होण्याचे प्रमाण वाढले आहे. भवानीनगर, पेठ परिसरातील नागरिकांसह परिसरातील विविध कंपन्यांतील कर्मचारी याच मार्गाचा वापर करीत असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ड्रेनेज वॉटर पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोठ्या प्रमाणात उखडण्यात आला.पूर्वीच्या ड्रेनेज कामानंतर उखडलेला डांबरी रस्ता अद्याप योग्य पद्धतीने दुरुस्त करण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नशिराबाद नगरपंचायतीने  याप्रकरणी तातडीने लक्ष घालून गटारीच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी तसेच रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या