नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील 108 वर्षांची ऐतिहासिक परंपरेचा वारसा असलेल्या व परिसरात सांस्कृतिक चळवळ जोपासणाऱ्या सार्वजनिक वाचनालयात पोलीस भरती, सैन्यभरती व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच अभ्यासिकेचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात येऊन ही अभ्यासिका सुरू करण्यात आली. उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून नशिराबादचे रहिवासी स्टेनोग्राफर किशोर प्रभाकर पाटील व ओरिएंट सिमेंट कंपनी नशिराबादचे प्रकल्प मॅनेजर रोहित जोशी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारून पूजन करण्यात आले. तसेच सरस्वती पूजन व माल्यरपण, दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच अभ्यासिकेसाठी खरेदी केलेल्या नव्या पुस्तकांचे देखील पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
वाचनालयाचे अध्यक्ष रत्नाकर पांढरकर यांनी किशोर पाटील यांचा व कार्याध्यक्ष बी. आर. खंडारे यांनी रोहित जोशी यांचा भावपूर्ण सत्कार केला. किशोर पाटील यांनी आपल्या मनोगतात नशिराबाद वाचनालयात वर्तमानपत्रे व ग्रंथ वाचूनच मला नोकरीची संधी मिळाल्याचा आवर्जून उल्लेख केला. आजपर्यंत नशिराबाद व परिसरातील 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना स्टेनोग्राफीचे शिक्षण देऊन त्यांना विविध ठिकाणी नोकरी मिळवून दिल्याचा आनंद असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपण वाचलेल्या पुस्तकांचे वाचन करून टीपण करायला शिकले पाहिजे. अभ्यासात सराव आणि सातत्य असले तर यश नक्कीच मिळते असे स्पष्ट केले. रोहित जोशी यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, ऑनलाइन अभ्यासापेक्षा ऑफलाइन केलेल्या अभ्यासाने आपल्या मेंदूची ग्रहणशक्ती वाढून स्मरणशक्तीत वाढ होते, इतरांपासून आपण प्रेरणा घेऊन स्वतःचा विकास करायला शिकले पाहिजे असा मौलिक उपदेश विविध उदाहरणांनी पटवून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष बी. आर. खंडारे यांनी केले. वाचनालयाने अत्यल्प म्हणजे वार्षिक तीनशे रुपये फी मध्ये विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका सुरू केली असून याची संकल्पना वाचनालयाचे अध्यक्ष रत्नाकर रामभाऊ पांढरकर यांची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचनालयाचे सभासद व्हावे व अभ्यासिकेचा लाभ घ्यावा,व नोकरीसाठी प्रयत्नशील राहून यश मिळवावे असे आवाहन याप्रसंगी केले. गावातीलच कल्पेश अहिरे (जळगाव पोलीस) अक्षय माळी (केंद्रीय सुरक्षा बल), तसेच लोकेश रंधे, चैतन्य इंगळे, निखिल बऱ्हाटे या विद्यार्थ्यांच पोलीस भरतीसाठी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांना गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज अरुण नाईक यांनी केले. तर आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक हरीश धनराज पाटील यांनी केले. कार्यक्रमास वाचनालयाचे संचालक जनार्दन शामराव माळी, मिठाराम शामराव म्हसकर, एडवोकेट प्रदीप देशपांडे, डॉ प्रमोद अमोदकर यांच्यासह असंख्य परीक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल ललित कावळे, क्लर्क किशोर पिंगळे व शिपाई दिनेश सावळे यांनी परिश्रम घेतले.