Tuesday, March 24, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबादमध्ये विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन’ यशस्वी; दरोड्यातील फरार आरोपी शस्त्रांसह अटकेत

नशिराबादमध्ये विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन’ यशस्वी; दरोड्यातील फरार आरोपी शस्त्रांसह अटकेत

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या विशेष मोहिमेत नशिराबाद परिसरात महत्त्वाची कारवाई करत दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. चेतन सूर्यभान पाटील (वय १८) याला दोन गावठी कट्ट्यांसह पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार २३ मार्च रोजी सायंकाळी ४ ते रात्री ११ या कालावधीत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले.

या मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांवरही धडक कारवाई करण्यात आली. तसेच अवैध रेती वाहतूक करणारा एक डंपर जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, भुसावळ येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील हा बसस्थानक परिसरात शस्त्रासह फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून रात्री सुमारे ८.२० वाजता संशयितावर छापा टाकला.झडतीदरम्यान आरोपीकडून एक लोखंडी गावठी कट्टा आणि एक डमी कट्टा जप्त करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही शस्त्रे ताब्यात घेत आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रशांत विरणारे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या