Tuesday, March 17, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद येथील जीर्ण जि.प. शाळेची इमारत धोकादायक; चार वर्षांपासून कारवाईचा अभाव, नागरिकांकडून...

नशिराबाद येथील जीर्ण जि.प. शाळेची इमारत धोकादायक; चार वर्षांपासून कारवाईचा अभाव, नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद सुनसगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जीर्ण व मोडकळीस आलेली इमारत विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून शासनाच्या चार वर्षांपासून चाललेल्या दिरंगाईमुळे संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित इमारत पाडण्यासंदर्भात शासनाने यापूर्वी निर्देश दिले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.जिल्हा परिषदेच्या अधिनस्त मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांच्या निर्लेखनाबाबत क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकाऱ्यांना शासन निर्णय क्र. जिपशा-२०२५/प्र.क्र.८३/१२४७०५०/आस्था-१५ या परिपत्रकान्वये निर्देश देण्यात आले होते. जिल्हा परिषदेतर्गत विविध योजनांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या अनेक इमारती कालांतराने जीर्ण होऊन मोडकळीस आल्या असून अशा इमारती पाडण्यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना ९ जानेवारी २०१२ च्या शासन परिपत्रकात तसेच ८ जून २०१२ च्या पुरक परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ठराव क्र. ६९० नुसार शिक्षण व क्रीडा समितीच्या शिफारशीवरून एरंडोल, भडगाव, पारोळा, चोपडा व जळगाव तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळांमधील जीर्ण वर्गखोल्यांच्या निर्लेखनास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक केंद्रशाळा नशिराबाद येथील तीन वर्गखोल्या पाडण्याचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.दरम्यान, या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन वेळा गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.संबंधित इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून अशीच मागील वर्षी खंडेराव मंदिरालगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली होती आणि त्यात एक लहान बालकाचा भिंतीखाली दाबून मृत्यू झाला होता या घटनेला काही कालावधी लोटलेला असताना समोरील शाळेची इमारत धोकादायक असून त्यामुळे एखादा मोठा अपघात या ठिकाणी घडू शकतो वेळीच सावधगिरी बाळगून निर्णय घेऊन इमारत पाडण्यात यावी अन्यथा प्रशासन इमारत पाडण्यासाठी बळीची प्रतीक्षा करीत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.तरी देखील प्रशासनाकडून आवश्यक ती हालचाल झालेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

याच परिसरात प्रत्येक शुक्रवारी आठवडे बाजार भरत असून अनेक विक्रेते व नागरिक या भिंतीलगत बसतात. तसेच शेजारीच जिल्हा परिषद कन्या शाळा असल्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तत्कालीन मुख्याध्यापकांनी दि. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जावक क्रमांक ३९१ अन्वये तसेच २७ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रस्ताव सादर करूनही त्यावर कार्यवाही न झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या गटविकास अधिकारी पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करण्यास सांगत असल्याने मुद्दाम वेळकाढूपणा केला जात आहे का, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित धोकादायक इमारत पाडण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात होणाऱ्या संभाव्य जीवितहानीची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही नागरिकांकडून करण्यात येत आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या