जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने नायलॉन अथवा सिंथेटिक मांजा विक्री व वापराविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आदेश जारी करत यावर्षी केवळ जप्तीपुरती मर्यादित न राहता, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११० अन्वये संबंधितांवर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ (Attempt to Culpable Homicide) हा गंभीर, अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. नायलॉन मांजा मानवी जीव व पशुपक्ष्यांस अत्यंत घातक असून गळा कापल्याने दुचाकीस्वार व नागरिकांचे बळी गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. विक्रेत्यांना या धोक्याची पूर्ण जाणीव असूनही नफ्यासाठी विक्री केल्यास, हे कृत्य नवीन कायद्यानुसार थेट ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ या व्याख्येत बसते, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष मोहीम राबविणार
प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत साध्या वेशातील विशेष पथके नेमण्यात आली असून ती ग्राहक बनून दुकानांची तपासणी करतील. तसेच गोदामे व घरांमध्ये साठवणूक केलेल्या नायलॉन मांजावर धाडसत्रे राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पतंग विक्रेत्यांना BNS व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कलम १४९ (BNSS 168) अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नागरिकांना आवाहन
नागरिक व पालकांनी मुलांना नायलॉन मांजा खरेदी करून देऊ नये. हा मांजा तुटत नसल्याने दुचाकीस्वारांच्या गळ्याला फास लागून गंभीर अपघात होतात. तसेच विजेच्या तारांवर अडकल्यास शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.
तक्रार कुठे करावी?
आपल्या परिसरात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ ११२ या हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
लागू होणारी कायदेशीर कलमे
BNS कलम ११० : सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न.
BNS कलम २२३ : जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन.
पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ व १५ : ५ वर्षांपर्यंत शिक्षा व १ लाख रुपयांपर्यंत दंड.

