Wednesday, February 18, 2026
police dakshta logo
Homeजळगावराष्ट्रीय महामार्ग ५३ वर एरंडोल व पारोळा परिसरात अंडरपास (VUP) ला ८०...

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एरंडोल व पारोळा परिसरात अंडरपास (VUP) ला ८० कोटीची मंजुरी खा. स्मिताताई वाघ

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील तरसोद ते फागणे दरम्यान एरंडोल शहरातील कासोदा रस्ता तसेच पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे वाहन अंडरपास (VUP) बांधण्यासाठी ८० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली. या प्रकल्पासाठी त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे हा महत्त्वाचा विकास प्रस्ताव मार्गी लागला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिक, वाहनचालक व शेतकरी यांच्याकडून तक्रारी येत होत्या. याची दखल घेत खासदार वाघ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तसेच National Highways Authority of India आणि Ministry of Road Transport and Highways यांच्याकडे निवेदने, चर्चा व प्रत्यक्ष पाठपुरावा केला होता.सध्या तरसोद ते फागणे दरम्यान NH-53 चे चौपदरीकरण काम फागणे-तरसोद कॉरिडॉर प्रा. लि. यांच्या माध्यमातून सुरू असून, याच अंतर्गत Non Regular Civil Works (NRCW) योजनेतून एरंडोल येथील कासोदा रस्ता आणि पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे VUP उभारणीस मान्यता देण्यात आली आहे.या प्रकल्पामुळे वाहतूक अधिक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच स्थानिक व्यापार, शेती उत्पादनांची वाहतूक आणि दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होऊन परिसराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून जळगाव मतदारसंघातील रस्ते व पायाभूत सुविधा विकासाला गती मिळत असल्याचे खासदार वाघ यांनी नमूद केले. जनतेच्या समस्या सोडवणे व विकासकामांना प्राधान्य देण्याचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या