न्हावी | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या घरफोड्या व चोरीच्या मालिकेत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. न्हावी येथील ईगल सांस्कृतिक मंडळाच्या दुर्गा देवी मंदिरातून चोरट्यांनी तब्बल ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी दोन वाजताच्या सुमारास घडली असून, चोरट्यांचा संपूर्ण प्रकार मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवर चढवलेले दागिने चोरून नेले. यात ३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, एक ग्रॅमचा मणी, ३ ग्रॅमचे कानातील दागिने यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे ७० हजार रुपये इतकी आहे. रविवारी सकाळी मंदिराचे पुजारी नारायण नेमाडे मंदिर उघडण्यासाठी आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, दोन संशयित व्यक्ती देवीच्या मूर्तीवरील दागिने काढताना स्पष्टपणे दिसून आले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच परिसरात घरफोडी झाल्याची घटना घडली होती. गेल्या तीन महिन्यांत झालेली ही चौथी चोरी असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.